स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या अत्यंत रंजक वळणावर आली आहे. मालिकेत एकामागून एक असे ट्विस्ट येत आहेत की प्रेक्षक अक्षरशः टक लावून पाहत आहेत.
अलीकडेच दोन वर्षांपासून सुरू असलेल्या आश्रम खून प्रकरणाचा निकाल लागला आहे आणि त्यात साक्षी व प्रियाला शिक्षा सुनावण्यात आली. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा हा एक महत्त्वाचा टप्पा होता.
पण आता एक नवा धक्कादायक ट्विस्ट मालिकेत समोर येणार आहे – सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य लवकरच उघड होणार आहे! नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं की प्रतिमा आश्रमात जाते आणि तिला भिंतीवर काढलेलं एक चित्र दिसतं. हे चित्र पाहून ती भावूक होऊन म्हणते, “माझी तन्वी सुद्धा असंच चित्र काढायची…”
हे ऐकताच मधुभाऊ काहीतरी लक्षात आल्यासारखे वागताना दिसतात. त्यामुळे पुढच्या भागात सायलीच प्रतिमाची हरवलेली मुलगी तन्वी आहे, हे स्पष्ट होणार, अशी शक्यता आहे.
दुसरीकडे, पूर्णा आजी व सुभेदार कुटुंबीय सायलीची माफी मागताना दिसतात. आतापर्यंत सायलीवर जे अन्याय झाले, त्याबद्दल सर्वजण खंत व्यक्त करतात. पूर्णा आजी स्वतः सायलीची सून म्हणून स्वीकृती देते, हे दृश्य प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.
या दोन मोठ्या ट्विस्टमुळे मालिका नव्या उंचीवर पोहोचली आहे. प्रेक्षकांनी सोशल मीडियावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत – लाईक्स, कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडतोय.